पुणे – संत सोपानकाका आषाढी वारी पालखी सोहळा पायी पंढरीला जाणार नसला तरी ‘वारीच्या वाटेवर’ या फेसबुक पेजद्वारे डिजिटल स्वरूपात भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे.
संत सोपानदेव महाराजांचे हे ११७ वे आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वर्ष आहे. करोना संसर्गामुळे पायी वारी सोहळ्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. पायी वारी रद्द करण्यात आली आहे. मात्र परंपरेनुसार सर्व कार्यक्रम होणार आहेत. भाविकांना संत सोपानदेव समाधी संस्थान येथे प्रस्थान सोहळ्यापासून आषाढी एकादशी व नंतर पौर्णिमेपर्यंतचे मंदिरातील सर्व कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळणार आहेत.
संत सोपानकाकांची नित्य पहाट पूजा, दुपारचे भजन, हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आषाढी वारी सोहळ्यातील नित्य परंपरेचे कीर्तन व जागर भजन, असे सर्व कार्यक्रम यावर्षी घरबसल्या फेसबुक पेज द्वारे पहायला मिळणार आहे. ‘वारीच्या वाटेवर’ या टीमचे प्रमुख श्री राजेश नलवडे यांनी याबाबत माहिती दिली.
अनिकेत भोईर, निलेश बागडे, गौरव रणपिसे, योगेश पाटील, अमन भोईर, सचिन गांधी, सुरज कापसे, रोहित यादव हे फोटो व व्हिडीओ च्या माध्यमातून प्रस्थान सोहळा भविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
श्री संत सोपानकाका समाधी संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ऍड.त्रिगुण महाराज गोसावी व चोपदार सिद्धेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करत आहे.
FB Page Link https://www.facebook.com/warichyavatevar/