‘या’ प्रगत देशाची संसदच महिलांसाठी असुरक्षित?

महिला खासदारांची रस्त्यावर उतरुन निदर्शने

कॅनबेरा – स्त्री शक्ती, नारी शक्ती, महिला सुरक्षा या विषयांवर जगात विविध व्यासपीठांवर बोलले जाते. महिला अत्याचारविषयक गुन्हे कमी करण्यासाठी कायद्यांची निर्मिती आणि कडक अंमलबजावणीविषयीही पोटतिडीकेने चर्चा जगभर होत असते. मात्र, एखाद्या देशाचे संसद भवन स्त्री अत्याचाराचे केंद्र बनले असेल, तर तुम्ही काय म्हणाल? होय हे खरे आहे.

कामाच्या ठिकाणी स्त्रीयांवर सर्वाधिक अत्याचार होतात, हे त्रिकालाबाधित सत्य मानले गेले आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये खुद्द कायदे मंडळाचे पुरुष सदस्य त्यांच्या महिला सदस्यांना लैंगिक अत्याचाराच्या शिकार बनवत असतील, यावर विश्‍वास ठेवणे कठीण जाईल. पण आता ऑस्ट्रेलियामधील महिला खासदारच याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियन संसदेतील पुरुष सदस्य स्वत:ला राजे समजतात आणि महिला सदस्यांचा विनयभंग करण्याला पुरुषार्थ मानतात. एका सदस्याने अन्य एका महिला सदस्याच्या शरीराला जबरदस्तीने स्पर्श केला होता. तर आणखी एका सदस्याने महिला सदस्याच्या तिच्या स्त्री असण्यावरुन अवमानकारक उल्लेख केल्याचे दिसून आले.

ज्युलिया बॅंक्‍स या संसद सदस्य असून, त्या म्हणाल्या की, मी जेव्हा प्रथम संसदेत आले तेव्हा या प्रतिष्ठेच्या कायदेमंडळाबाबत मला सार्थ अभिमान होता. मात्र, प्रत्यक्षात मी सदनातील पुरुष सदस्यांचे वागणे पाहिले तेव्हा मला असे वाटले की हे सर्वजणच साधारण ऐशीच्या दशकातील मानसिकतेमध्ये आहेत. अनेक संसद सदस्य दारू पिऊनच संसदेत येतात. बोलताना त्यांच्या तोंडाला दारूचा उग्र दर्प येत असतो. तर अनेक जणांच्या संसद कार्यालयातील फ्रिजमध्ये दारूच्या बाटल्या भरलेल्या असतात. अनेक सदस्य महिलांविषयीचे विकृत विनोद आणि व्हिडीओजचा आनंद संसदेची कार्यवाही सुरु असताना घेत असतात, असेही बॅंक्‍स म्हणाल्या.

विधानसभेच्या निवृत्त कर्मचारी ब्रिटनी हिगिन्स यांनी संरक्षणमंत्री कार्यालयातली बलात्काराची बातमी जाहीर केली, तेव्हा हजारो महिला रस्त्यावर उतरल्या.
आता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही म्हणावे लागत आहे की, संसदेची स्वच्छता करणे आवश्‍यक बनले आहे. कामगार पक्षाच्या नेत्या तान्या लिबेरसेक म्हणाल्या, लैंगिम समानतेबाबत ऑस्ट्रेलिया हा देश मागास असून त्यांची मानसिकता मध्ययुगीन आहे. अनेकांनी संसदेला पुरुषांचे मनोरंजन केंद्र म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.