मुंबई – शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे 40 हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे 6 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
या मोहिमेचा दि. 1 जुलै रोजी कृषी दिनी समारोप करण्यात येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून दि.1 जुलैपासून ही मोहीम राबविली जाते. मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलैपूर्वी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला.
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाविषयी 5 हजार 564 गावांमध्ये कार्यक्रम झाला. त्यामध्ये 84 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बीजप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी 5 हजार 671 गावांमध्ये कार्यक्रम घेऊन 88 हजार 727 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
5 हजार 457 गावांमध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये 88 हजार 670 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बीया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञानाबाबत 4 हजार 699 गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्या माध्यमातून 78 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.