लाहोर – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात उद दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या घराबाहेर आज एक शक्तीशाली कारबॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये किमान तिघेजण ठार झाले आणि किमान 20 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
जव्हार शहराच्या बीओआर सोसायटीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सईदच्या घराबाहेर हा स्फोट झाला. जर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नसता तर अधिक मोठे नुकसान झाले असते, असे पंजाब प्रांताचे पोलीस प्रमुख इनाम घनी यांनी सांगितले.
या कारमध्येच स्फोटके बसवलेली होती. पोलिस बंदोबस्त असल्यामुळेच ही कार अधिक पुढे जाऊ शकली नाही, असे पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक घनी यांनी सांगितले. हा एक दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद विरोधी विभागाने घटनास्थळाची पहाणी केली आणि सर्व शक्यता पडताळून तपासाला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.
या बॉम्बस्फोटामागे विरोधी गुप्तचर संघटनांचा हात असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला.
या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेल्यांना जिना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. या जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. हा सफोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे जवळपासच्या काही घरांचेही नुकसान झाले. स्फोटाच्यावेळी सईद घरातच उपस्थित होता, अशी अफवा पसरली होती. टेरर फायनान्स प्रकरणी सईद कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगतो आहे.