पुणे -शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या एसटी स्थानकाची अत्याधुनिक पद्धतीने निर्मिती करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळेत बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल.
यासाठी प्रकल्पाच्या कामाची सद्य:स्थिती पाहणे आणि त्या अनुषंगाने नियोजन करणे, हे या प्रत्यक्ष भेटीचे प्रयोजन होते, असे मत राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर येथील रा.प. महामंडळाच्या जागेवरील मेट्रो कामकाजाची पाहणी शुक्रवारी परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वास्तुविशारद महाव्यवस्थापक (बांधकाम) भूषण देसाई, मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता राजेश जैन आदी उपस्थित होते. यानंतर परब यांनी वाकडेवाडी येथील बसस्थानकाची पाहणी केली. दरम्यान, आगार प्रमुख अनिल भिसे यांनी बसस्थानकवरील सुविधांबाबत माहिती दिली.
प्रवाशांची गैरसोय होता कामा नये. त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. बसस्थानक आणि बसेसमध्ये स्वच्छता राखावी. प्रवासी, अधिकारी आणि कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतील याबाबत दक्षता घेण्याची सूचना परब यांनी वाकडेवाडी येथील भेटीदरम्यान दिली. यासह त्यांनी लालपरी, शिवशाही, निमआराम बसेसची पाहणी केली.
शिवसेनेचा वर्धापन दिन
शिवसेनेचा वर्धापन दिन हा आम्हा शिवसैनिकांसाठी एक उत्सव आणि सण असतो. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाईल. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख त्यादिवशी आपल्या भावना व्यक्त करतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि ते उद्या आपले मार्गदर्शन करतील, असे ऍड. परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम जुलै 2022 पर्यंत
शिवाजीनगर येथील एसटीच्या जागेवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करताना संबंधित मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पुणे मेट्रोच्या वतीने सध्या सुरू असलेले काम जुलै 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर येथील जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारेल, असे ऍड. परब म्हणाले.