- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नियोजन
- अधिकाऱ्यांकडे सोपविल्या जबाबदाऱ्या
पिंपरी – करोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांचे प्रचंड हाल झाले तसेच प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आला होता. तशी परिस्थिती तिसऱ्या लाटेत उद्भवू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे.
महापालिकेने विविध अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या महत्वांच्या जबाबदाऱ्या सोपवून त्या निश्चित करण्यात आल्या आहेत. समन्वयचा अभाव होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. तिसरी लाट अधिक तीव्र असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेची वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क आहे. तातडीने करावयाच्या उपाययोजना व रूग्ण संख्या कोणत्याही परिस्थितीत वाढू नये. ती आटोक्यात ठेवणे असे नियोजन पालिकेने केले आहे. पालिका प्रशासनाने वायसीएम व जिजामाता रूग्णालयात बाल रूग्णांसाठी बेड आणि घरकुलात कोविड सेंटरची व्यवस्था केली आहे. टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मोठ्या खासगी रूग्णालयांना ही तसा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधिक काम सुरळीतपणे पार पाडली जातील, असा दावा आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.