- करोनाचे भय ना भिती
- मावळ तालुक्यात नागरिक व्यक्त करताहेत नाराजी
पवनानगर – मावळ तालुक्यातून अजूनही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील अकरा गावे अजूनही हॉट स्पॉट असतानाही गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली पर्यटकांची गर्दी मावळवासियांच्या मनातील भीती वाढवित आहे.
मावळ तालुका आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील डोंगर, दऱ्या, धबधबे, किल्ले, धरणे, वेगवेगळे पॉईंट्स पर्यटकांना कायमच आकर्षित करत असतात. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र निसर्गाने आपल्या विविध सुंदर रुपांची मुक्त उधळण केलेली दिसून येत आहे. सूर्याचा दाह झेलून रखरखीत झालेले डोंगरमाथे पावसाने पुन्हा बहरले आहेत. नेक घाटमाथे वाटसरुंचं लक्ष वेधून घेत आहेत. या निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्यासाठी पर्यटक करोनाच्या काळातही मावळात येत आहेत.
महाराष्ट्रात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. नागरिक जणू काही याच संधीची वाट पाहत होते. शनिवारी आणि रविवारी मावळातील अनेक पर्यटन स्थळे गर्दीने फुलली. परंतु निसर्गाचा आनंद घेत मौज-मजा करताना मात्र करोनाबाबतचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे सर्वत्र दिसून आले.
शनिवार व रविवार या दिवशी अनेक ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन आहे. परंतु वीकेंडचा एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांनी मावळ तालुक्यातील लोणावळा, पवनमावळ, आंदर मावळ, नाणे मावळ ठिकठिकाणी गर्दी केली. अनेक पर्यटकांच्या तोंडाला मास्क सुद्धा दिसून येत नव्हते. पावसाचा शिडकावा झाल्यानंतर लगेचच सुट्टीचं निमित्त साधत शनिवार आणि रविवारी मावळ तालुक्यातील आणि पुण्यानजीक असणाऱ्या डोंगरमाथ्यांच्या दिशेनं वाटा पर्यटकांच्या वळल्या आहेत.
इथं असणाऱ्या पवनाधरण परिसर, विसापुर, तुंग तिकोणा, लोणावळ्यामधील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट वर अनेक पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्त असूनही इथं नागरिकांची गर्दी पाहायला मिळत असून, लोणावळ्याच्या रत्यांवर वाहतूक कोंडीही दिसत आहे. तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करुन आलेल्या पर्यटकांना पोलीस प्रशासने माघारी पाठवले. परंतु अनेक जणांनी वेगवेगळ्या मार्गांनी या भागांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कायम प्रशासन आणि सरकारला जबाबदार धरणारे नागरिक करोनाबाबत किती गंभीर आहेत, हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या जणू तिसऱ्या लाटेलाच निमंत्रण देत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने स्थानिक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
लोणावळा ग्रामीण पोलीस अंतर्गत पवना पोलीस मदत केंद्राकडून शेती व अत्यावश्यक सेवा वगळता मोकाट फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. काहीजण लवकर दंड घ्या पण आम्हाला जाऊ दया अशी विनंती करत होते. अनेक युवकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच पुढील काही काळ नागरिकांनी येथे येऊ नये, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर व पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे. या वेळी पोलीस नाईक विजय गाले, कॉंस्टेबल रफीक शेख, सुनील गवारी, श्रीकांत घरदाळे, भिमा वाळूज आदींनी ही कारवाई केली. वाघेश्वर येथे पर्यटकांची गर्दी येथील ऐतिहासिक मंदिर असलेल्या वाघेश्वर येथील प्राचीन मंदिर पाण्यात जाते. सध्या धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे हे शिवकालीन मंदिर दिसत असल्याने पर्यटकांनी येथे देखील गर्दी केली होती.