पुणे – शहरातील गंभीर गुन्हे किंवा एखाद्या भागात अपघात घडल्यास घटनास्थळाचे छायाचित्र नागरिकांनी पुणे पोलिसांनी तयार केलेल्या ‘माय सेफ पुणे’ अॅपवर पाठविल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध होणार आहे. या अॅपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून गस्त (बीटमार्शल) गस्त घालण्यात येते. एखाद्या ठिकाणी दुर्घटना किंवा गंभीर गुन्हा घडल्यास त्याचे छायाचित्र माय सेफ पुणे अॅपवर टाकल्यास त्वरीत मदत उपलब्ध करण्यात येते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे अॅप विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अॅपचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस आयुक्त गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, उपायुक्त स्वप्ना गोरे, उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त पंकज देशमुख, प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
शहर पोलीस दलातील परिमंडळ चारच्या अखत्यारीतील भागात उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील घटनांचे छायाचित्र या अॅपवर टाकल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळाचा पत्ता पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, या विचाराने संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
संगणकीय प्रणालीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. करोनाच्या संसर्गात चांगली कामगिरी करणारे पोलीस आधिकारी विजय पुराणिक, गौरव देव, सुहास टिळेकर, उत्तम गाडे, गौरव कांबळे, रेणुका भांगरे आदींना पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेले पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी देण्यात आली आहे. सामेश संतोष म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.