पुणे – पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळाले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेण्यात येणार आहेत. डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
मृतांची लवकरात लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात येणार आहेत. घटनास्थळी एका मृतदेहाचा अवशेष सापडला आहे, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान पौड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पोलीस ठाण्याच्या परिसरातील वातावरण शोकाकुल झाले होते.
दरम्यान, डीएनए चाचणीसाठी ससून रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. मृतांचे नातेवाईक सकाळी सात वाजल्यापासून नमूने देण्यासाठी हजर होते. मात्र सायंकाळी सहा पर्यंत फक्त कागदपत्रांचे सोपस्करच सुरु होते. यामुळे नातेवाईकांचे डीएनएसाठी नमूने घेण्यात आले नव्हते. अगोदरच दुखात असलेले नातेवाईक यामुळे संतप्त झाले होते.