मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. अमिरातीतच होणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेचा अंतिम सामना दसऱ्याच्या मुहूर्तावर खेळवण्यात येणार आहे.
भारतात सुरू असलेली ही स्पर्धा बायोबबलमध्ये राहूनही काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्थगित करण्यात आली होती. स्पर्धेतील 29 सामने पार पडले होते. आता अमिरातीत उर्वरित 31 लढती खेळवल्या जाणार आहेत. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित 31 सामने अमिरातीतच खेळवले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
येत्या 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल स्पर्धेचा उर्वरित टप्पा खेळवला जाणार आहे. अंतिम सामना दसऱ्याच्या दिवशी 15 ऑक्टोबरला होणार आहे.
आयपीएल 2020 प्रमाणे आयपीएल 2021 स्पर्धेचे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजा या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी संमती दर्शविली आहे.
बीसीसीआय आयपीएल 2021 स्पर्धेचे उर्वरित सामने 25 दिवसांत खेळवणार आहे. डबल हेडर सामने कमी करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत अमिरातीत उष्णता जास्त असल्याने खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागेल, त्यासाठीच कमीत कमी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.