दुबई – आयसीसीने आगामी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी फॉलोऑनबाबत नवा नियम तयार केला आहे. त्यानुसार जर सामन्याचा पहिला दिवस वाया गेला तरी फॉलोऑनचा नियम बदलणार नसल्याचे आयसीसीने सांगितले.
हवामान आणि पावसाचा विचार करता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. साउदम्प्टन येथे येत्या 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा अंतिम सामना होणार आहे.
आयसीसीच्या फॉलोऑन नियम 14.1.1नुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पहिल्या डावात 200 धावांची आघाडी घेतल्यास प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले जाऊ शकते. 3 ते 4 अशा कमी दिवसांच्या सामन्यासाठी ही आघाडी 150 धावांची असते. 2 दिवसांच्या सामन्यात 100 धावांची, तर दोन डावांच्या पण एका दिवसाच्या सामन्यात 75 धावांची आघाडी फॉलोऑनसाठी असते.
सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ न झाल्यास नियम 14.1 खेळाच्या पहिल्या दिवसापासून उर्वरित दिवसांनुसार (राखीव दिवसासह) लागू होईल. सामना सुरू होणारा दिवस संपूर्ण दिवस म्हणून नोंदला जाईल. पहिले षटक सुरू होताच खेळाचा दिवस मोजला जाईल. जर पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला नाही, तर फॉलोऑनसाठी आवश्यक असलेली आघाडी 150 धावा अशी होईल.
दोन्ही संघ
भारत – रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, महंमद शमी, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला.
न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेन्ट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रवींद्र, मिशेल सॅन्टनर, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॅटलिंग (यष्टीरक्षक), विल यंग.