बीड : जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेविका अनिता जोगदंड-भोसले यांनी दहा दिवस कोरोनाशी झुंज दिली. परंतू ती अपयशी ठरल्याने रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
अनिता भाेसले या स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात कर्तव्य बजावत होत्या. २६ मे रोजी त्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे त्यांना तात्काळ कोरोना वॉर्डातील आयसीयू २ मध्ये दाखल करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर फिजिशियन व इतर तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. परंतू याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्राणाची आहुती देऊन रूग्णसेवा देणाऱ्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना डॉक्टर, परिचारीका, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. अधिकारीही भावूक झाले. अनिता भोसले यांना रूग्णालय प्रशासनाकडून श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. आगोदरच छाया बहिरे या परिचारीकेला गमावल्यानंतर जिल्हा रूग्णालयाने अनिता भाेसले यांच्या रूपाने दुसरी कोरोना योद्धा गमावली आहे.