शाळा व महाविद्यालयातून लैंगिक शिक्षण सुरू करावे
पुणे, ता. 4 – कुटुंबनियोजन कार्यक्रमास अधिक चांगले यश येण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच शाळा व इतर महाविद्यालयांतून लैंगिक शिक्षण सुरू करावे अशी सूचना मेजर जनरल एच. सेनगुप्ता यांनी एका भाषणात केली. वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांसाठी कुटुंबनियोजन विषयक अध्यापनाविषयीच्या चर्चासत्रात सेनगुप्ता बोलत होते.
चंबळ प्रदेशात महिला पदयात्रा
इंदूर – चंबळ प्रदेशात डाकूंच्या आत्मसमर्पणानंतर शांतता कायम राहावी व गावागावांत प्रेम व सद्भावना वाढावी म्हणून उत्तर प्रदेशाच्या अन्नपूर्णा महाराणा यांच्या नेतृत्वाखाली एक पदयात्रा सुरू झाली आहे. ही पदयात्रा वर्षभर चालू राहील. ग्वाल्हेर जिल्हा पूर्ण करून यात्रा आता भिंड जिल्ह्यात सुरू आहे.
एकंदरीत रडण्याने फायदाच होतो! नव्या संशोधनातून निष्कर्ष
नवी दिल्ली – मॉंट्रिअल येथील मॅकजिल विद्यापीठातील शरीरविज्ञान संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, रडणे हे एकंदरीने स्त्री व पुरुष दोघांना फायद्याचे आहे. त्यांचे म्हणणे रडणे म्हणजे केवळ अश्रू गाळणे नव्हे. घशात आवंढा येणे हे महत्त्वाचे आहे. कित्येक खंबीर पुरुषांनाही नियमाने रडे येते.
पुरुष व जरा मोठी मुले एकावेळेस 2 मिनिटांपेक्षा अधिक वेळ रडू शकत नाहीत. मात्र स्त्रिया व मुली 15-15 मिनिटांपर्यंत रडू शकतात. हे संशोधक पुढे म्हणतात, घशांत आवंढा येणे हे पुरुषांचे बाबतीत अधिक आढळते. स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. हुंदके देऊन रडण्याने मानवी मनातील नको असलेली भावना दूर सारली जाते.