नवी दिल्ली : एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय.
एलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्सअॅप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी केलाय.
ऑक्सिजन मिळाल्यानंतरही एलोपॅथीची औषधं खाणाऱ्या लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपण एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा सन्मान करतो. पण, गुगल केलं तर आयुर्वेदाला स्टूपिड सायन्स म्हटलं जातं. आपण कुणाचा द्वेष करत नाही, पण कुणी सनातन धर्म आणि योगावर अपमानास्पद टिप्पणी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही रामदेव बाबा यांनी दिलाय.
रामदेव बाबा म्हणाले की, IMA हा एलोपॅथीचा ठेकेदार नाही. ही एक NGO आहे जी इंग्रजांच्या काळात बनली. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर हे कधीही विसरुन चालणार नाही की एलोपॅथीची निर्मिती करणारे महर्षी सुश्रुत होते. आयुर्वेद आणि योगाने अनेक गंभीर आजार बरे केले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कुणीही ही बाब नाकारु शकत नाही, असंही रामदेव बाबा म्हणाले.