मोरगाव – उद्या दि .१९ पासून सुरू होणाऱ्या मुर्टी , तरडोली , मोरगाव या गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना या विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता रद्द केला आहे . यात्रा उत्सव कमिटी मार्फत जनजागृती करून यात्रा रद्द भरणार नसल्याने मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन केले आहे .
ग्रामीण भागात दरवर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो . ग्रामीण पट्ट्यामध्ये हा एकमेव मोठा उत्सव असल्याने गावातील तरुण वर्ग उस्फूर्तपणे सहभाग घेत असतात . या दिवशी मंदिरावर तसेच गावात संपूर्ण विद्युतरोषणाई केली जाते . तसेच पाहुण्यांसाठी गोड – तिखट जेवणाचा बेत आवर्जून आखला जातो .
गावामध्ये यात्रेच्या पहील्या दिवशी सायंकाळी जोगेश्वरी व श्री नाथनाथ यांचा विवाह सोहळा संपन्न होतो . या विवाहाला हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात
मात्र गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने सार्वजनिक उत्सव संपन्न करण्यास परवानगी नाकारली आहे . यामुळे तरडोली गावात दवंडी व विविध व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे यात्रा उत्सव रद्द झाला असल्याची माहिती तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी दिली आहे . तरडोली व मुर्टी येथील भैरवनाथ यात्रा उत्सवा उद्या दिनांक 19 व 20 रोजी तर मोरगाव येथील भैरवनाथ यात्रा उत्सव 20 व 21 रोजी संपन्न होणार होता . या गावांमध्ये मनोरंजनासाठी संगीत व वगनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते.
“सलग दुसऱ्या वर्षी मोरगाव येथे भैरवनाथ यात्रा उत्सव भरणार नाही . कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करावे तसेच श्रींस घरातूनच नैवेद्य दाखवावा.” – निलेश केदारी (सरपंच, ग्रामपंचायत मोरगाव)
“कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात वाढत चालला आहे . यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी भैरवनाथ मंदिर परिसरात , गावांमध्ये घोळक्याने एकत्र येऊ नये . यात्रेनिमित्ताने गावात पै – पाहुणे बोलवु नयेत.”- नवनाथ जगदाळे – (सरपंच, ग्रामपंचायत तरडोली)