सॅंटियागो- कोणताही उपक्रम किंवा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी त्या कार्यक्रमाची एक रंगीत तालीम घेण्याची प्रथा आहे. मात्र चिलीमधील सॅंटियागो शहरातील एका महिलेने स्वतःच्या मृत्युची रंगीत तालीम घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
आपला मृत्यू झाल्यानंतर आपली भेट घेण्यासाठी कोण कोण येईल हे पाहण्याच्या इच्छेतून अशा प्रकारची रंगीत तालीम घेतली असे समोर आले आहे. रंगीत तालीम कार्यक्रमासाठी तिने एक शवपेटीका भाड्याने घेतली. एका छायाचित्रकाराला ही छायाचित्रे काढण्यास सांगितले नियमित अंत्यसंस्काराच्या वेळी जे विधी केले जातात ते विधी करण्यासाठीही तिने संपूर्ण नियोजन केले होते आणि त्या विधींचेही छायाचित्रण करण्यात आले.
महिला त्या शवपेटीकेमध्ये तब्बल तीन तास झोपून राहिली होती. ज्या नातेवाईकांना तिचा हा उपक्रम माहिती होता त्यांनी बनावटपणे रडून तिच्या या उपक्रमाला हातभार लावला होता. 59 वर्षीय मायरा अलोंझो या महिलेने या रंगीत तालीमसाठी तब्बल एक हजार पाउंड म्हणजे एक लाख रुपये खर्च केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे तिलाही आपला मृत्यू आणि त्या नंतरचे विधी याबाबत सतत चिंता वाटत होती. असंच चालू राहिलं आणि आपला मृत्यू करोनाने झाला तर आपल्या अंत्यसंस्काराला कोणीही येणार नाही अशी चिंताही तिला वाटत होती.
या चिंतेतूनच तिच्या डोक्यात आपल्या मृत्यूची रंगीत तालीम घेण्याची गोष्ट आली. त्यानंतर आपल्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन तिने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले शवपेटीकेत बसण्यापूर्वी मायराने पांढराशुभ्र पोशाख परिधान केला होता.
मृतदेहाच्या नाकात घालतात त्याप्रमाणे तिने आपल्या नाकामध्ये कापसाचे बोळेही घातले होते. आता प्रत्यक्ष मृत्यूनंतर माझे काय होणार याबाबत मला कोणती चिंता आता राहिली नाही असे हा उपक्रम पार पडल्यावर मायराने सांगितले; पण अशाप्रकारे मृत्यूची रंगीत तालीम करणे हा एक चेष्टेचा प्रकार असल्याची टीका समाजातील काही लोकांनी केली आहे.