लंडन, दि. 14 – ब्रिटनने आता दृष्य स्वरूपात करोनापासून मुक्तीचा निःश्वास टाकायला सुरुवात केली आहे. अजून तेथील करोनाचे पूर्ण उच्चाटन झालेले नसले तरी तेथे बऱ्यापैकी लसीकरण पूर्ण झाल्याने लोकांनी आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सोमवारपासून ब्रिटनमधील सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अन्य सार्वजनिक सुविधा सुरू होत आहेत. थिएटर आणि वस्तुसंग्रहालयेही सुरू होत आहेत. लोकांना आता तेथे सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे बागडता येणार असून लोकांना एकमेकांची गळाभेट घेण्यासही अनुमती दिली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या संग्रहालयांमध्ये आता लसींच्या रिकाम्या बाटल्या आणि टेस्टिंग किट्स ही करोनाच्या काळातील साधने ठेवली जाणार आहे. करोना आता इतिहास जमा झाल्याचे प्रतीकात्मक दर्शन यातून घडणार आहे.
ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने तेथील लोकांमध्ये ही सुटकेची भावना निर्माण झाली आहे. या कोविड लाटेचा युरोपातील सर्वाधिक फटका ब्रिटनला बसला होता. तेथे तब्बल 1 लाख 28 हजार नागरिक करोनामुळे मरण पावले आहेत. तेथे रोज सुमारे दोन हजारावर मृत्यू होत होते. पण आता तेथे मृतांचा सध्याचा आकडा केवळ एक अंकीच आहे.
संपूर्ण ब्रिटनमध्ये रोज सुमारे 70 हजार नागरिक करोनाबाधित असल्याचे आढळत होते, पण आता ही संख्या केवळ दोन हजारांच्या आसपास आली आहे. ब्रिटनमधील 68 टक्के नागरिकांना करोना लसींचा पहिला डोस देण्यात आला आहे. ही संख्या सुमारे चार कोटींच्या जवळ आहे. तर एक कोटी 80 लाख लोकांना लसींचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.
लसींचे संशोधन आणि त्याच्या उत्पादनावर जोर दिल्याने ब्रिटनमधील लसींची उपलब्धता तातडीने होऊ शकली आहे आणि त्यामुळे करोनावर नियंत्रण आणणे त्यांना सहज शक्य झाले आहे. ब्रिटनने दोन डोसमधील अंतर बारा आठवड्यांचे ठेवल्याने त्याचाही चांगला लाभ दिसून येत आहे.
आरोग्य व्यवस्थेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही पहिल्या लाटेच्यावेळी ज्या चुका केल्या होत्या, त्यात आम्ही सुधारणा करू शकलो आहोत. त्यामुळे आम्हाला ब्रिटनमधील ही स्थिती नियंत्रणात आणता आली आहे. तथापि कोविड विषाणूंचा जो नवीन प्रकार उद्भवला आहे त्याचा धोका अजून संपलेला नाही त्यामुळे बाहेरच्या देशांतील लोकांना येथे येऊ देण्याविषयी जरा आस्तेकदमच निर्णय घेतले जाणार आहेत.