राजगुरूनगर : चांदूस (ता. खेड) गावात अनधिकृतपणे हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे लाखो रुपये किमतीचे रसायन व साधनसामुग्री खेड पोलिसांनी नष्ट केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वप्नील गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना खबऱ्याकडून चांदूस गावात हातभट्टी दारू काढली जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत आहे अशी माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी पोलिसांची टीम करून संबंधित गावात जाऊन दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे कच्चे रसायन व साधन सामग्रीची तोंडफोड करून नष्ट केले.
खेड पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार करणारे सुरेश जयसिंग राठोड, राजू नवलसिंग राठोड दोघेही राहणार चाकण ता खेड याना रंगेहात पकडून अटक केली आहे. त्यांच्यावर मुंबई प्रोव्हीजन दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सतिष गुरव यांच्यासह पोलीस हवालदार नवनाथ थिटे,अमोल चासकर, संदीप भापकर गुन्हे शोध पथकाचे स्वप्नील गाढवे, सचिन जतकर ,शेखर भोईर, विशाल कोठावळे, निखिल गिरी गोसावी असे सहभागी होते.