चेन्नई, दि.8 -तामीळनाडूचे नवे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी शनिवारी 15 दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्या निर्णयाचे प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने स्वागत केले. मात्र, अण्णाद्रमुकचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपने लॉकडाऊनला विरोध दर्शवला.
तामीळनाडूतील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या 25 हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी स्टॅलिन यांनी राज्यव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे 10 ते 24 मे या कालावधीसाठी तामीळनाडू लॉक राहील. संबंधित निर्णय जाहीर करताना स्टॅलिन यांनी शेजारील केरळ आणि कर्नाटक राज्यांत लॉकडाऊन लावण्यात आल्याकडे लक्ष वेधले. स्टॅलिन यांच्या निर्णयाचे अण्णाद्रमुकने स्वागत केले.
लॉकडाऊनमुळे करोना फैलाव रोखण्यास मोठा हातभार लागेल, अशी भूमिका त्या पक्षाने घेतली. मात्र, भाजपने वेगळा सूर लावला. लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला. स्थलांतरित कामगारांच्या हितासाठी कुठलीही घोषणा करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांतील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यातून बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनसदृश निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये भाजपशासित राज्यांचाही समावेश आहे.