नवी दिल्ली, दि. 7 – देशातील निवडणुकांचा सीझन संपल्याबरोबर केंद्र सरकारने तेल कंपन्यांना इंधनाचे नवीन दर लागू करण्याची अनुमती दिल्यानंतर आज लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली. आज पेट्रोलच्या दरात 29 पैसे तर डिझेलच्या दरात 31 पैसे इतकी वाढ झाली आहे.
त्यामुळे राजस्थानात काही भागात आज पेट्रोलचा दर 102 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. आजच्या दरवाढीमुळे दिल्लीतील पेट्रोलचा दर 91 रूपये 27 पैसे तर डिझेलचा दर 81 रुपये 73 पैसे इतका झाला आहे. मध्यप्रदेशात पेट्रोलचा दर 101 रुपये 86 पैसे इतका झाला आहे. तर डिझेलचा दर 99 रूपये 95 पैसे इतका झाला आहे.
मध्यंतरी निवडणुकांच्या काळात देशातील तेल कंपन्यांना 18 दिवस तेलाचे दरवाढवण्यास मनाई करण्यात आली होती. केंद्र सरकारने गेल्यावर्षीै मार्च महिन्यात पेट्रोलवर एकदम 21 रूपये 58 पैसे इतकी तर डिझेलवर 19 रुपये 18 पैसे इतकी प्रचंड उत्पादन शुल्क वाढ केली होती. त्यानंतर हे दर सतत चढेच राहिले आहेत.