रायबरेली,- करोनामुळे उत्तर प्रदेशमधील आणखी एका भाजप आमदाराचा मृत्यू झाला आहे. रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचे निधन झाले आहे. एका आठवड्यापूर्वी दल बहादूर कोरी यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
राम मंदिर आंदोलनात कोरी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळाले. दल बहादूर कोरी यांनी 2004 साली भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. पण त्यांनी 2014 साली पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2017 साली भाजपने त्यांना सलोन विधानसभेचे तिकीट दिले आणि निवडून आले.