नवी दिल्ली : देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे करोनामुळे एका व्यक्तीचे निधन झाले. मात्र वडिलांचे निधन सहन न झाल्याने त्यांचा मुलीने अंत्यसंस्कार सुरु असतानाच जळत्या चितेवर उडी मारली. तेथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांनी धावपळ करत कसं तरी तिला त्या चितेवरुन बाजूला केलं आणि रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी ७० टक्के भाजली आहे. या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
भारत पाकिस्तान सीमेला लागून असणाऱ्या बारमेर जिल्ह्यामध्ये घडल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. बारमेरच्या जिल्हा मुख्यालया जवळच्या रॉय कॉलिनी येथे राहणाऱ्या दामोदर दास शारदा यांचा करोनामुळे मृत्यू झाला. घरच्या व्यक्तींनी जिल्हा मुख्यालया जवळच असणाऱ्या स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. चितेला मुखाग्नि देण्यात आला. चितेला अग्नी देण्यात आला तेव्हा दामोदर यांचे नातेवाईक आणि मुलगीही स्मशानभूमीमध्ये उपस्थित होते.
चिता जळू लागल्यानंतर दामोदर यांची ३० वर्षीय मुलगी चंद्रा शारदाने जळत्या चितेवर उडी मारली. समोरचे दृष्य पाहून उपस्थितांचा एकच गोंधळ उढाला. मात्र चंद्राची थोरली बहीण पिंकीने तिला बाहेर काढण्यासाठी खटपट सुरु केली. त्यानंतर इतरांनाही तिला मदत केली. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चंद्राला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचे शरीर ७० टक्के जळाले होते. चंद्राला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथं तिच्यावर उपचार सुरु असले तरी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये जाऊन या मुलीचा जबाब नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मुलगी जबाब नोंदवण्याच्या परिस्थितीमध्ये नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिला बरं वाटू लागल्यानंतर जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीची परिस्थिती चिंताजनक असल्याने बारमेर येथे प्राथमिक उपचार करुन प्रकृती स्थिर झाल्यावर तुला जोधपुरच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात येणार आहे.