अहमदाबाद – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सला आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केएल राहुलच्या पोटात काल रात्री अचानक दुखत होते.
यानंतर त्याला औषध देण्यात आली. मात्र, यानंतरही त्याला बरं वाटत नसल्यामुळे इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आले. या ठिकाणी त्याची टेस्ट केली असता त्याला ऍपेंडिक्स झाल्याचे स्पष्ट झाले.
यावर उपचारासाठी आता केएल राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पंजाब किंग्सने दिली आहे. केएल राहुल नसताना पंजाबच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणास देण्यात येईल, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, गुणतालिकेत पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. पंजाबचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मयंक अग्रवालही दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही. त्यामुळे पंजाबला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे.