विराटने तिसऱ्या क्रमांकावरच खेळावे; वीरेंद्र सेहवागचा बंगळुरूला सल्ला

मुंबई  -आयपीएल 2021मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी केली आहे. मात्र, गत दोन सामन्यांत बंगळुरूला पराभव पत्कारावा लागला आहे. यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे. अशातच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने बंगळुरू संघाला खास सल्ला दिला आहे.

आयपीएलच्या 14व्या मोसमात विराट कोहली बंगळुरूच्या डावाची सुरुवात करून देत आहे. परंतु सलामीला येऊन त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. पॉवरप्लेमध्येच तो पुन्हा माघारी परतत आहे. अशा परिस्थितीत विराटने त्याच्या तीन नंबरच्या पोझिशनवर खेळायला यायला हवे.

तसेच बंगळुरूच्या संघाने सलामीला मोहम्मद अझरुद्दीनला पाठवायला हवे. सध्यातरी रजत पाटीदारच्या तुलनेत मोहम्मद अझरुद्दीन हा खूप चांगला पर्याय आहे. कोहलीने तिसऱ्या नंबरवरच खेळायला हवे. त्याच्यानंतर मॅक्‍सवेल आणि डिव्हिलियर्स ही जोडी आहेच, असा सल्ला सेहवागने दिला आहे.

डावाची सुरुवात जर देवदत्त पडिक्‍कल आणि अझरुद्दीनने केल्यास बंगळुरूला निश्‍चितच फायदा होऊ शकतो. ही सलामी जोडी जर अपयशी ठरल्यास विराट, मॅक्‍सवेल आणि डिव्हिलियर्सच्या रूपात बंगळुरूकडे क्‍लास प्लेअर्स आहेत, असेही सेहवाग म्हणाला.
दरम्यान, आयपीएल 2021 मोसमाच्या अगोदरच विराट कोहलीने जाहीर केले होते की, तो बंगळुरूच्या डावाची सुरुवात करेल.

आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांत त्याने डावाची सुरुवात केली आहे. मात्र, त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. सलामीला येऊन तो सपशेल अपयशी ठरत असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. केवळ राजस्थान रॉयल्सविरुद्धचे अर्धशतक वगळता त्याला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.