अहमदाबाद – यंदाच्या आयपीएल मोसमात बॅकफूटवर गेलेल्या पंजाब किंग्जला पुन्हा विजयी लय मिळविण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरोधात शुक्रवारी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. कोलकाता संघाकडून पराभव पत्करलेल्या पंजाबसमोर बंगळुरूचे “विराट’ आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने आतापर्यंत 5 विजय मिळविले असून ही लय कायम ठेवण्यासाठी ते उत्सुक असणार आहे.
चेन्नईकडून एकमात्र पराभव झालेल्या बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावित विजेतेपदाच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. बंगळुरू संघातील अनेक खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी करत फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे. दुसरीकडे पंजाबच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न असल्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाबने गत तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करत 106, 120 आणि 123 अशी कमी धावसंख्या उभारली होती.
आतापर्यंतच्या सामन्यात राहुलने फलंदाजीत फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. मयांक अग्रवालला अद्याप चांगली सलामी देता आलेली नाही, तर ख्रिस गेलही सहा सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यात खेळू शकला. तसेच निकोलस पूरनलाही धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. यामुळे उद्याच्या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड मलानला अंतिम संघात खेळविण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या गोलंदाजीत आक्रमकपणा दिसून आला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात 195 धावांचाही त्यांना बचाव करता आला नाही. दुसरीकडे बंगळुरू संघाने सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधात फक्त 1 धाव राखून विजय मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.
एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखविला असून गोलंदाजांनीही दिल्लीविरोधात भेदक मारा करत संघाला पाचवा विजय मिळवून दिला. बंगळुरूची फलंदाजी बहरात असून विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, डिव्हिलियर्स आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या चार खेळाडूंनी साजेशी खेळी केल्यास संघाचा विजय निश्चित मानला जाईल.
गत सामन्यात रजत पाटीदारनेही आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे. तसेच कायल जॅमीसनही खालच्या क्रमवारीत फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो. बंगळुरूची गोलंदाजीही प्रभावी ठरत आहे. हर्षल पटेलने आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली असून महंमद सिराजनेही गत सामन्यात ऋषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर फलंदाजीला असताना शेवटच्या षटकात 14 धावांचे आव्हान रोखण्यात यशस्वी ठरला होता.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर