पुणे : स्वतंत्र ऑक्‍सिजन प्लांट उभारणी कार्यही प्रगतीपथावर

विप्रो हॉस्पिटलमध्ये आणखी 150 ऑक्‍सिजन बेड

पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोना बाधितांसाठी वरदान ठरत असलेले आणि जिल्हा परिषदेकडून चालवल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील विप्रो कोविड हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. सध्या ऑक्‍सिजनवरील बाधितांची संख्या वाढत असल्याने विप्रो कंपनीने या कोविड हॉस्पिटलमध्ये तब्बल 150 बेड्‌सचे सुसज्ज ऑक्‍सिजन वॉर्ड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

त्यासाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या पंधरा दिवसात स्वतंत्र ऑक्‍सिजन प्रकल्प उभारण्याचे काम हे काम पूर्ण होईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली. या कामाला आणि विप्रो हॉस्पिटलला आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. सध्या हॉस्पिटलला बाहेरून ऑक्‍सिजनचा पुरवठा करावा लागत आहे.

गेल्या वर्षी ग्रामीण भागातील करोना रुग्णांना उपचार घेण्यासाठी थेट पुणे शहर अथवा पिंपरी-चिंचवड शहराची वाट धरावी लागते. याच पार्श्‍वभूमीवर विप्रो कंपनीने पुढाकार घेत सर्व सोयी-सुविधासह तब्बल 439 बेड्‌सच सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारून चालविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिले.

गेल्या वर्षी 13 जुलै पासून हे कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल असून, आतापर्यंत तब्बल 3 हजार 600 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. विप्रो कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे सर्व आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेने पुरवले आहेत. तर रुग्णालयाचा इतर सर्व खर्च म्हणजे स्वच्छतेपासून रुग्णांच्या जेवण खाण्याचा खर्च विप्रो कंपनी करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.