नवी दिल्ली – भारतात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. त्यातच अनेक राज्यांतून करोना लसीचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहे. यावरून आता काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी लसीकरणाची जागतिक पातळीवरील अनेक देशांची आकडेवारी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यानुसार भारतात केवळ 1.4 टक्के लसीकरण झालं आहे. तर आपल्यानंतर बांग्लादेश असून येथे 1 टक्का लसीकरण झालं आहे. विशेष म्हणजे भारतात करोनावरील दोन प्रतिबंधक लसी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. दरम्यान भारतातील गरज भागवण्याऐवजी भारतीय लसी निर्यात केल्यामुळं तुटवडा भासत असल्याची टीका सध्या केंद्र सरकारवर विरोधकांकडून करण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमधील आकडेवारीनुसार करोना प्रतिबंधक लस देण्यात अमेरिका अव्वलस्थानी असून येथे 26.5 टक्के लसीकरण झालं आहे. तर इंग्लंडमध्ये 15.9 टक्के, इटलीमध्ये 7.9 टक्के, फ्रान्समध्ये 7.1 टक्के, जर्मनीमध्ये 6.8 टक्के, ब्राझिलमध्ये 4.3, मॅक्सिकोमध्ये 3.5, इंडोनेशियामध्ये 2.3 टक्के लसीकरण पार पडलं आहे. ही टक्केवारी देशाच्या लोकसंख्येवर आधारित आहे.