नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपास आला आहे. अनेक राज्यात भाजपने सत्ता काबिज केली असून यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाटा मोठा आहे. भाजपच्या प्रत्येक विजयात शहा यांचं योगदान बहुमूल्य आहे. मात्र याच अमित शहा यांचं आतापर्यंत सहा वेळा तिकीट कापण्यात आलं आहे. याचा खुलासा खुद्द शहा यांनीच केला आहे.
विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या कार्यकर्त्याची समजूत काढताना अमित शहा यांनी आपलही तिकीट अनेकदा कापलं गेल्याचा मोठा खुलासा केला आहे. गुजरातमधील भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदार संघासाठी तब्बल 6 वेळा मला तिकीट नाकारल्याचं ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरचं प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळे अमित शहांना सहा वेळेस पक्षानं तिकीट नाकारले. दरवेळी अमित शहा हेच अडवाणी यांचे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अडवाणी यांनी माघार घेतल्यानंतर भाजपाने अमित शहा यांना गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली.