नवी दिल्ली – भारतात होणाऱ्या आगामी फिफा अंडर-17 महिला विश्वचषक आणि एएफसी महिला आशिया कप स्पर्धेच्या संचालिका रोमा खन्ना यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत त्यांनी आपला पदभार सोडला आहे. आता एआयएफएफ हे फिफासोबत चर्चा करून नवीन नियुक्ती करणार आहे.
रोमा यांनी 2019मध्ये अंडर-17 विश्वचषक स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेचे नेतृत्व केले होते. यानंतर त्यांची स्थानिक आयोजन समितीच्या स्पर्धा संचालिकापदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या एएफसी महिला आशियाई स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियाही त्यांनी यशस्वीपणे पार पडली होती.
आपल्या पदाचा राजीनामा देताना रोमा खन्ना म्हणाल्या, एआयएफएफ (अखिल भारतीय फुटबॉल संघ) आणि फिफा (आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्था) यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानू इच्छिते. भारतामध्ये या स्पर्धेचे नेतृत्व करण्याचा बहुमान मला मिळाला. स्थानिक आयोजन समितीने केलेल्या कामाचा मला अभिमान आहे.
तसेच 2022 हे वर्षे भारतातील फुटबॉल आणि महिला क्रीडा स्पर्धेसाठी मोठे वर्ष ठरेल आणि मी भारतीय महिला संघाला चियर करण्यासाठी उत्साहित असल्याचे त्यांनी सांगितले.