जसजसं वय वाढतं तसतसं चेह-यावर व इतर भागांवर सुरकुत्या, डाग पडायला लागतात. शरीराची त्वचा सैल पडायला लागते. केस पांढरे होतात. हे असतं एजिंग म्हणजे शरीरावर पसरत जाणारी वृद्धत्वाची लक्षणं. मग शरीरावरील ही वृद्धत्वाची चिन्हं लपवण्यासाठी बोटॉक्ससारखी इंजेक्शन्स घेतली जातात, महागडी क्रीम, लोशन व औषधं वापरली जातात. पण येणा-या वृद्धत्वाचं टेन्शन न घेता जरा आपल्या आसपास डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की महागडया औषधांपेक्षा निसर्गातच चिरतरुण राहण्यासाठी मदत करू शकणा-या औषधांचा खूप मोठा खजिना आहे.
वय वाढणं किंवा वाढत्या वयानुसार चेह-यावर सुरकुत्या येणं, मुरुमं-पुटकुळ्या येणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. वयवाढीनुसार अशा समस्या वाढतात. मात्र याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर मात करून अधिकाधिक तरुण कसं राहता येईल याचा विचार करा. पण त्यासाठी बाजारात मिळणा-या महागडया क्रीमचा वापर करण्यापेक्षा काही नैसर्गिक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केलात तर यावर अगदी सहज मात करता येईल.
अश्वगंधा
ही वनस्पती प्रामुख्याने तारुण्याशी संबंधित आहे. अश्वगंधामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते. ती चेतासंस्थांना शांत करतेच तसंच ताण कमी करण्याचं काम करते. शरीरात ऊर्जा निर्माण करते. दीर्घकाळापासून येत असलेला थकवा अश्वगंधामुळे दूर होतो. इतकंच नव्हे तर पाठीचा कणा आणि सांधेदुखीवर ही अतिशय गुणकारी आहे.
गोटु कोला
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी असणा-या टॉनिकमध्ये ही वनस्पती प्रामुख्याने वापरली जाते. शरीराला झालेल्या कोणत्याही इजेचं अथवा दुखापतीचं निवारण करते. नियमित सेवनाने मानसिक ताण कमी करते. तसंच धमन्यांसाठीदेखील गोटु कोला चांगली आहे. हर्बल टीमध्ये गोटु कोला वापरली जाते त्यामुळे दिवसातून एकदा तरी ग्रीन टी घ्यावा.
तुळस
ज्वालाग्रही, जंतूविरोधी असे कितीतरी गुण तुळशीत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी तुळशीची पानं आवर्जून सेवन करावी. तसंच कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही तुळशीचा वापर होतो. तुळशीचा अर्क काढून सेवन केल्याने कित्येक आजारापांसून आपण दूर राहू शकतो.
सेलरी
आयुर्वेदाचार्य त्यांच्या औषधांमध्ये प्रामुख्याने सेलरीच्या बियांचा खूप वापर करतात. सेलरीच्या बियांमुळे सांधेदुखी किंवा गाऊटचा त्रास कमी होतो. याचा आपल्या आहारात समावेश करणं अतिशय सोपं आहे. एक चमचाभर सेलरीच्या बिया कपभर उकळत्या पाण्यात घालाव्यात. ते पाणी थंड झाल्यावर प्यावं. असं दिवसातून दोनदा करावं.
हळद
हळदीचे बरेच फायदे आहेत. हळदीमुळे पेंशींचं संरक्षण होतं. तसंच हळदीमुळे सुरकुत्या, व्रण तसंच आणखी काही गोष्टींपासून त्वचेचं संरक्षण होतं. तसेच इतर काही त्वचेचे आजार होऊ नये म्हणूनही तिचा वापर करावा.