मॉस्को – प्राण्यांसाठी करोनाविरोधी लस बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. करोना विषाणूचा प्रसार प्राण्यांच्या माध्यमातून होत असल्याने प्राण्यांवर करोनाविरोधी उपचार होणे गरजेचे असल्यानेच ही लस बनवण्यात आली असल्याचे रशियाने म्हटले आहे. प्राण्यांसाठी बनवलेल्या या खास लसीचे व्यापक प्रमाणातील उत्पादन एप्रिल महिन्यापासून केले जाण्याची शक्यता असल्याचेही रशियाने म्हटले आहे.
या लसीचे नाव कार्निवॅक कोव असे असून रशियातील कृषीविषयक निरीक्षक संस्था रोसेलखोझनद्रोझ्नने या लसीबाबतची माहिती दिली आहे. या लसीची चाचणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. कुत्री. मांजरी, माकडे, मिंक, कोल्हा आणि अन्य प्राण्यांवर या लसीची चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीचे निष्कर्श अतिशय सकारात्मक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्या प्राण्यांना ही लस दिली गेली आहे, त्यांच्यात करोना विरोधी ऍन्टीबॉडीज 100 टक्के तयार झाल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे, असे रोसेलखोझनद्रोझ्नचे उपप्रमुख कोन्स्टॅनिन सॅवेनकोव यांनी सांगितले. प्राण्यांना करोनाची लागण होऊ नये म्हणून बनवण्यात आलेली ही एकमेव आणि पहिलीच लस असल्याचे त्यांनी सांगितले.