गांधीनगर – बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी गुजरातमध्ये 95 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. त्यामुळे त्या राज्यात केवळ 5 टक्के जमिनीचे संपादन बाकी आहे.
गुजरातचे महसूल मंत्री कौशिक पटेल यांनी सोमवारी विधानसभेत संबंधित माहिती दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातच्या 8 जिल्ह्यांत 73.64 लाख चौरस मीटर जमिनीच्या संपादनाची गरज आहे. मागील वर्षीच्या अखेरपर्यंत सुमारे 70 लाख चौरस मीटर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. ती प्रक्रिया 2 जिल्ह्यांत पूर्ण झाली आहे. जमीन संपादनावर आक्षेप घेणाऱ्या शेतकऱ्यांचे 1 हजार 908 अर्ज आतापर्यंत राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्या प्रकल्पांतर्गत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांकडून बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला जात आहे. त्यातून महाराष्ट्रातील जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. भारतीय रेल्वेने तो प्रकल्प 2023 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र, महाराष्ट्रातील जमीन संपादनाची प्रक्रिया रखडल्याने निर्धारित वेळेत प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता मावळली आहे.