लखनौ – भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने रविवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावा करण्याचा विक्रम साकार केला. अशी कामगिरी करणारी मिताली पहिलीच महिला क्रिकेटपटू बनली आहे.
मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात 26 वी धाव पूर्ण करताच हा विक्रम केला. मितालीचा हा 213 वा एकदिवसीय सामना होता. तिच्या नावावर 7 शतके व 54 अर्धशतके आहेत. तिसऱ्या सामन्यात मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय व कसोटी तसेच टी-20 सामने मिळून एकूण 10 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
ही करणारी ती जगातील दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली होती. इंग्लंडच्या चार्लेट एडवर्डस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होती. मितालीने एकदिवसीय क्रिज्ञकेटमध्ये 7 हजार धावा केल्या असून 89 टी-20 सामन्यांत 2 हजार 364 धावा केल्या आहेत. 10 कसोटी सामन्यांत तिच्या नावावर 663 धावा आहेत.
तरीही मालिका गमावली…
मिताली राजच्या देदीप्यमान कामगिरीनंतरही भारताच्या महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. इतकेच नव्हे तर भारतीय संघाला ही मालिकाही गमवावी लागली. प्रथम फलंदाजी करताना पुनम राऊतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 4 बाद 266 धावा केल्या. मात्र, गोलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 48.4 षटकांत 3 गडी गमावून 269 धावा करत जिंकला व पाच सामन्यांच्या या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. त्यांच्याकडून लायझेल ली, लौरा व्होलार्ट, मिगनेन डू प्रेज व लॅरा गुडॉल या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली व संघाचा विजय साकार केला.