पुणे – प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाकडे गेल्या पाच वर्षांत एकूण 14 लाख 28 हजार रुपये इतकी विद्यार्थ्यांची अनामत रक्कम पडून असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न विद्यार्थी संघटनेने केला आहे.
महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तरमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य अन्य कारणांसाठी 500 रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांना परत दिली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज आणि कागदपत्रे दिल्यास, त्यांना ही रक्कम महाविद्यालयाकडून देण्यात येते. मात्र, शिक्षण पूर्ण होताच काही विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयाकडे येत नाहीत. त्यामुळे ही रक्कम महाविद्यालयाच्या बॅंक खात्यात शिल्लक राहते.
यासंदर्भात स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी “मॉडर्न महाविद्यालयाने गेल्या पाच वर्षांत किती विद्यार्थ्यांना अनामत रक्कम दिली, किती शिल्लक आहे,’ याचा माहिती अधिकारातून तपशील घेतला. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीत्रकात नमूद केले की, “गेल्या पाच वर्षांत मॉडर्न महाविद्यालयाकडे एकूण 30 लाख 3 हजार 830 रुपये विद्यार्थ्यांची अनामत रक्कम जमा झाली. त्यापैकी सद्यस्थितीत 15 लाख 75 हजार 400 रुपये अनामत रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.’
करोनामुळे अनामत रकमेसाठी विद्यार्थी महाविद्यालयात आलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना रक्कम दिली गेली. अनामत रक्कम परत मागणारे विद्यार्थी हे अंतिम वर्षाचे असतात. या शैक्षणिक वर्षांमध्ये परीक्षा व परीक्षांचे निकाल उशिरा लागल्यामुळे अनामत रक्कम परत मागणारे अनेक विद्यार्थी अजूनपर्यंत महाविद्यालयात आलेले नाहीत. यामुळे अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया कमी वेगाने होत आहे. यामध्ये महाविद्यालयांची काही चूक नाही.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय
अनुदानित अभ्यासक्रमासाठी 500 रुपयांपर्यंत, तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी जास्तीत विद्यार्थ्यांची अनामत रक्कम 5 हजार रुपयांपर्यंत असते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थीच अनामत रक्कम घेण्यासाठी महाविद्यालयात येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ही रक्कम महाविद्यालयातील स्टुडंट वेल्फेअरसाठी वापरली जाते. मात्र ज्यांनी अर्ज केला, त्यांना त्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम ऑनलाइनद्वारे देण्यात येते.
– प्रा. शामकांत देशमुख, सचिव, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी