मेलबर्न – जागतिक महिला टेनिसमधील स्टार खेळाडू नाओमी ओसाका हिने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हेश स्यु वेई हिच्यावर 6-2, 6-2 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. आता उपांत्य फेरीची हाय व्होल्टेज लढत ओसाका व अमेरिकेची अव्वल मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिच्याशी होणार आहे.
पुरूष एकेरीत स्पेनचा द्वितीय मानांकित राफेल नदाल डॅनियल मेदवेदेव, स्टीफानोस त्सित्सिपासने तर, महिला एकेरीत ओसाकासह ऍश्ले बार्टी व कॅरोलिना मुचोव्हा यांनीही आगेकूच केली.
नवव्या मानांकित मॅटिओ बॅरेटिन्नीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने पाचव्या मानांकित त्सित्सिपासला पुढे चाल देण्यात आली. पुरुष एकेरीच्या अन्य लढतींमध्ये रशियाच्या चौथ्या मानांकित मेदवेदेवने मॅकेन्झी मॅक्डोनाल्डवर 6-4, 6-2, 6-3 अशी मात केली.
रशियाच्याच सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हने 24 व्या मानांकित कॅस्पर रूडविरुद्ध 6-2, 7-6 अशी आघाडी मिळवलेली असताना कोपऱ्याच्या दुखापतीमुळे रूडला सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे आता चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात मेदवेदेव आणि रुब्लेव्ह एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.
महिला एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित बार्टीने शेल्बी रॉजर्सचा 6-3, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवून सलग तिसऱ्या वर्षी उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेक प्रजासत्ताकच्या 25 व्या मानांकित मुचोव्हाने 18 व्या मानांकित एलिस बर्टेन्सला 7-6 (7-5), 7-5 असे नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली.
अमेरिकेच्या 22 व्या मानांकित जेनिफर ब्रॅडीने डोना वेदिकचा 6-1, 7-5 असा फडशा पाडला, तर अमेरिकेच्याच बिगरमानांकित जेसिका पेगुलाने युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनाला 6-4, 3-6, 6-3 असे नमवून आश्चर्यकारकरीत्या उपांत्यपूर्व फेरी गाठली.