नवी दिल्ली, दि. 14 – जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा आज स्मृतिदिन होता. त्यानिमीत्त सीआरपीएफतर्फे जम्मू काश्मीरातील लेथपोरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात या दलाच्या चाळीस शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. या हल्ल्यात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे त्यांना आम्हीं विसरणार नाहीं आणि ही घटना घडवून आणणाऱ्यांनाही माफ केले जाणार नाही असे सीआरपीएफने म्हटले आहे.
सीआरपीएफने या संबंधात जे ट्विट केले आहे त्यात त्यांनी वरील निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यात प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांबरोबरही आम्ही ठामपणे उभे आहोत. सीआरपीएफचे महासंचालक ए. पी. महेश्वर यांनी या शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या एका व्हिडीओ चित्रफितीचेही अनावरण केले. यावेळी बोलताना महेश्वर म्हणाले की, शुरत्व आमच्या रक्तातच असून सीआरपीएफच्या जवानांनी कायमच याचे दर्शन घडवले आहे. आज प्रसारीत करण्यात आलेले हे व्हिडीओ बुक 80 भागांचे आहे आणि ते एकूण तीनशे मिनीटांचे आहे. त्याची प्रत्येकी एक प्रत शहीद जवानांच्या कुटुंबियांना पाठवली जाणार आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या 78 वाहनांच्या ताफ्यावर जैश ए महंमदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यावेळी आरडीएक्स स्फोटकांचा वापर करून जे एक वाहन उडवून देण्यात आले त्यात चाळीस जवान शहीद झाले आहेत. या घटनेने सारा देश हादरला होता. या घटनेनंतरच भारताने पाकिस्तानात बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या हवाई तळावर हल्ला केला होता.