नवी दिल्ली, – देशाच्या कारागृहात जे एकूण कैदी आहेत त्यातील 27.37 टक्के कैदी हे अडाणी म्हणजेच पुर्ण निरक्षर आहेत तर 5677 कैदी तंत्रज्ञानाची पदवी किंवा पदविका घेतलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहातील कैद्यांच्या शैक्षणिक स्थितीचा जो अहवाल दिला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, देशभरातील कारागृहांमध्ये सध्या एकूण 4 लाख 78 हजार 600 कैदी आहेत, त्यातील 27.37 टक्के म्हणजेच 1 लाख 32 हजार 729 कैदी निरीक्षर आहेत. एकूण कैद्यांपैकी 41.55 टक्के कैदी अल्पशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपेक्षा कमी आहे. कारागृहातील एकूण कैद्यांपैकी 1 लाख 3 हजार 36 म्हणजेच 21.52 टक्के कैदी दहावीपेक्षा जास्त शिकलेले आहेत. 6.31 टक्के म्हणजेच 30 हजार 201 कैदी पदवीधर आहेत. सध्या देशातील सर्वाधिक कैदी उत्तरप्रदेशात असून तेथील कारागृहांमध्ये एकूण 1 लाख 1 हजार 297 कैदी आहेत.