वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालवलेल्या महाभियोगाच्या दुसऱ्या कारवाई दरम्यान सिनेटने कॅपिटलमधील धुडगूसप्रकरणी “क्लीन चीट’ दिली आहे. सिनेटमध्ये महाभियोगाला मंजूरी मिळण्यासाठी दोनतृतीयांश मतदानाची गरज होती. मात्र तेवढे मतदान होऊ शकले नाही.
सिनेटमध्ये चार दिवस चाललेल्या सुनावणीनंतर 100 सदस्यांच्या सभागृहात झालेल्या मतदानात ट्रम्प यांच्याविरोधात 57 तर ट्रम्प यांच्या बाजूने 43 मते पडली. महाभियोगाला मंजूरी मिळण्यासाठी दोनतृतीयांश मताधिक्यासाठी 10 मते कमी पडली. महाभियोगाची कारवाई दोन वेळेला झालेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. तर अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही महाभियोगाची कारवाई झालेले ते पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.
ट्रम्प यांच्या समर्थकांनी 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसद असलेल्या कॅपिटलवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल संसदेने 74 वर्षीय ट्रम्प यांच्यावर बंडखोरीचा आरोप लावला होता. ट्रम्प समर्थकांना धुडगूस घालण्यासाठी चिथावणी देणे हे पूर्णपणे असत्य आहे आणि ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग म्हणजे राजकीय सूडनाट्य असल्याचा दावा ट्रम्प यांच्या वकिलांनी केला होता.
महाभियोगाच्या कारवाईदरम्यान बिल कॅसिडी, रिचर्ड बुर, मिट रोमनी, सुझान कोलिन्स, लिसा मुरकोव्स्की, बेन सासे आणि पॅट टूमी या सात रिपब्लिकन पक्षाच्या सिनेट सदस्यांनी त्यांच्यावर महाभियोग करण्याच्या बाजूने मतदान केले. जर त्यांना सिनेटच्या मतदानातून दोषी ठरवले गेले असते तर त्यांना पुन्हा अध्यक्ष पदावर जाण्यापासून रोखले गेले असते.
मात्र ट्रम्प हेच कॅपिटल हिंसाचाराला जबाबदार होते, असे रिपब्लिकन पक्षाचे सिनेट सदस्य मिच मॅक्नोनेल यांनी नंतर सांगितले. मात्र ट्रम्प यांच्याविरोधात त्यांनी मतदान केले नाही. त्यांनी ट्रम्प यांच्या बाजूनेच मतदान केले होते. ट्रम्प यांच्या बाजूने मतदान करणे हे घटनाबाह्य ठरले असते. कारण ट्रम्प हे आता अमेरिकेचे अध्यक्ष नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. ट्रम्प यांच्यावर न्यायालयात अजूनही खटला चालवता येऊ शकेल असेही ते म्हणाले.
सिनेटमधील महाभियोगाच्या मतदानानंतर निर्दोष सुटल्यानंतर”कोणत्याही अध्यक्षाला यासारख्या गोष्टींतून कधीही जावे लागले नाही.’ असे एक निवेदन ट्रम्प यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी अथक परिश्रम घेतल्याबद्दल आणि सत्याचे रक्षण केल्याबद्दल आपल्या वकिलांच्या टीमचे आणि इतरांचे आभार मानले. आपण सर्वांनी मान्य केलेल्या राज्यघटनेबद्दल आणि आपल्या देशाच्या पवित्र कायदेशीर तत्त्वांसाठी जे अभिमानाने उभे राहिले त्या सर्व अमेरिकन सिनेटर आणि कॉंग्रेसच्या सदस्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, असे ट्रम्प यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.
चौकट
ट्रम्प यांच्याकडून महाभियोगाच्या कारवाईचा निषेध…
“कायद्याच्या राजकारणाची बदनामी करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे, उत्तेजक जमावबंदी करणे, दंगली करणाऱ्यांना क्षमा करणे आणि न्यायाचा राजकीय बदला घेण्यासाठी हटवणे आणि छळ करणे, काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेतील एका राजकीय पक्षाला मोफत पास देण्यात आला आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.’ असे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. हा खटला म्हणजे इतिहासातील सर्वात मोठा जादूटोणा असल्याचे म्हणून ट्रम्प यांनी महाभियोगाच्या खटल्याचा निषेध केला.