पुणे – महापालिकेच्या कोंढवा येथील संत गाडगे महाराज शाळेतील बालवाडी शिक्षिकेला करोनाची लागण झाली आहे. ही शिक्षिका कार्यरत असल्याने ही शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या 12 इतर शिक्षकांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. तर सुमारे 150 विद्यार्थ्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पालकांना करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. तसेच शाळेचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे.
या शाळेत सुमारे 8 शाळा भरतात, त्यात, मराठी, उर्दू तसेच इंग़्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळा दोन सत्रांत भरतात. त्या अंतर्गत शाळेत एकूण 1165 विद्यार्थी असून त्यातील 614 विद्यार्थी पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळेत येतात, तर 460 विद्यार्थी नियमित येतात. शाळेत एकूण 55 शिक्षक, 16 बालवाडी शिक्षक तर 17 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
शाळेतील 32 वर्षीय बालवाडी शिक्षिकेने प्रकृती ठीक नसल्याने करोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून मुख्याध्यापकांना सकाळी 10 वाजता कळवण्यात आले. त्यानंतर, महापालिकेने तातडीने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, या वेळी शाळेत सुमारे 150 विद्यार्थी होते.
सकाळी संबंधित शिक्षिकेचा अहवाल करोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने शाळेची तपासणी करण्यात आली असून संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच शाळा चार दिवस बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्या शिक्षकांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. या अहवालानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
– सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, मनपा