पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी

12 ध्वनिफिती पोलिसांकडे सुपूर्द; विदर्भातील मंत्री अडचणीत?

मुंबई – बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण या तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कथित ध्वनिफिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केल्या. या प्रकरणाची चौकशी करून घटनेचा तपास करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही संशयित मंत्र्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी पुण्यात वानवडी येथे आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील एक कॅबिनेट मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. त्यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले. तसेच ध्वनिफिती जोडल्या आहेत. या ध्वनिफितीमध्ये पुरुषी आवाज कोणाचा आहे, ती व्यक्ती काय बोलते, या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने पूजाला आत्महत्या करण्यास भाग पाडले काय, यासंदर्भात सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

त्याचबरोबर पूजा चव्हाणच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संशयित मंत्र्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यासदंर्भात समाजमाध्यमांवर वाघ यांनी ध्वनिचित्रफीत टाकली असून पूजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. पूजाचा मोबाइल व लॅपटॉप दरवाजा तोडून ताब्यात घ्या, असे हे मंत्री तिच्यासोबतच्या मित्रास का सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. राजकीय पक्षांना दुसरे काही काम नसल्याने या प्रकरणावरून ते वादंग निर्माण करत आहेत. मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप झाले. नंतर सत्य सर्वांसमोर आले, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.