पुणे(प्रतिनिधी) – मतिमंद असल्याच्या कारणावरून पोटच्या दहा दिवसाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणात वडिलांना सत्र न्यायाधीश एस.एम.आगरकर यांनी जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात त्या मुलाच्या आईवरही गुन्हा दाखल आहे.
कुंवरसिंग सुभाष ठाकुर असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. जयकुमार कदम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ठाकुर दांपत्याला 2 ऑक्टोबर 2020 रोजी मुलगा झाला. मात्र, तो मतिमंद असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे दोघे नाराज होते. त्यांनी मुलाला अनाथ आश्रमातही ठेवण्याचा प्रयत्न केला. 12 ऑक्टोबर रोजी पत्नीने फोन करून मुलाच स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर तो तिथे गेला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जलशुध्दीकरण केंद्र, तळजाई विनविभागाच्या जागेच्या संरक्षक भिंतीजवळ खड्डा पाडून त्यामध्ये प्रेत पुरले.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी सिंहगड रोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार खून, पुरावा नष्ट करणे आणि संगणमताच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुवरसिंग याला अटक केली आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. केवळ संशयावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा गुन्हा सहभाग नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल झाले आहे. ससुन रुग्णालयातील मिळालेल्या एका प्रमाणपत्रात बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते आजारपणानेही गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंवरसिंह याला जामीन देण्याची मागणी ॲड. जयकुमार कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.