नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात आभार प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत आहे.
राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टीकैत यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करुन आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला गर्व असल्याचे लिहले आहे.
गर्वसे कहो..
हम सब आंदोलनजीवी है..
जय जवान
जय किसान! pic.twitter.com/8zSXztMUf2— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिले आहे. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है… या घोषवाक्याचे रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केले आहे. त्यामुळे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलाय. राऊत यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है… जय जवान- जय किसान असेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, मराठीतही याच आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.