मेलबर्न – अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅंडस्लॅम स्पर्धांपैकी एक मानली जात असलेली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा अखेर आजपासून सुरू होत आहे. करोनाचा धोका शहराच्या सीमेपर्यंत आलेला असतानाही ही स्पर्धा होणारच अशी ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने दिलेली ग्वाही अखेर खरी ठरली.
यंदा मात्र, राफेल नदाल, नोवाक जोकोवीच, सेरेना विल्याम्य या मानांकित खेळेडूंना नवोदित खेळाडूंकडून धक्का बसण्याची शक्यता जास्त आहे. रॉजर फेडररने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याने नदाल व जोकोविच माजी मारणार का नवा विजेता मिळणार याची उत्सूकता आहे.
हार्ड कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील तज्ञ जोकोविचने गतवर्षी डॉमिनिक थीमला नमवून कारकीर्दीतील 17व्या ग्रॅंडस्लॅमवर मोहोर उमटवली. त्यामुळे यंदाही त्यालाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यातच रॉजर फेडररने या स्पर्धेतून माघार घेतल्याने जोकोविचसमोरील आव्हान तुलनेने सोपे झाले आहे. मात्र, जोकोविचला गत उपविजेता थीमसह अलेक्झांडर ज्वरेव्ह, डॅनिएल मेदवेदेव, स्टीफानोस त्सित्सिपास या नव्या खेळाडूंकडून कडवी झुंज मिळू शकते. विशेषत: थीमने गतवर्षी अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. नदालनेही गेल्या चार मोसमांत हार्डकोर्टवर यश मिळवले असल्याने तो देखील जोकोविचच्या मार्गात अडसर ठरू शकतो.
महिला एकेरीत यंदाही नवी विजेती पाहायला मिळू शकते. मार्गारेट कोर्ट यांच्या 24 ग्रॅंडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून तिला सातत्याने जेतेपदाच्या जवळ येऊन पराभूत व्हावे लागत आहे. गतविजेती सोफिया केनिन, सिमोना हॅलेप, ऍ श्ले बार्टी, बियांका आंद्रेस्कू यासारख्या नामांकित खेळाडू या स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार असल्याने यंदा सेरेनाला अधिक संघर्ष करावा लागणार आहे.
भारतीयांच्या कामगिरीकडे लक्ष
सुमित नागल, रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे तीन भारतीय टेनिसपटू यंदा या स्पर्धेत खेळणार आहेत. पुरुष एकेरीत एकमेव नागल याच्यावर भारताची मदार असून कारकीर्दीतील तिसऱ्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत किमान तिसरी फेरी गाठण्याच्या निर्धाराने तो मैदानात उतरेल. पुरुष दुहेरीत बोपण्णा आणि शरण विदेशी सहकाऱ्यांसह खेळणार आहेत. महिला एकेरीत पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या अंकिता रैनाची नशिबावर मदार असून मुख्य फेरीतील एका प्रमुख खेळाडूने माघार घेतली, तरच अंकिताला संधी मिळू शकेल.