पुणे – करोनाच्या संकटकाळानंतर फुरसुंगीसारख्या ग्रामीण भागात वॉरियर्स स्पोर्टस क्लबे महिला प्रिमियर लीगचे आयोजन केले होते. या लीगचे उपांत्य फेरीचे सामने उद्या, सोमवारी होणार असून, अंतिम सामना मंगळवारी (ता. 9) होणार आहे.
महिला क्रिकेट स्पर्धांच्या व्यग्र कार्यक्रमामुळे वॉरियर्सची स्पर्धा लांबणीवर पडली होती. मात्र, आता ही स्पर्धा पुन्हा एकदा मैदानावर आली असून, उद्या उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.
वीरा वॉरियर्स, एच.पी. सुपरनोव्हाज, सिंबा वॉरियर्स आणि पीएमपी इलेव्हन या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पीएमपी इलेव्हन संघाने तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. उर्वरित तीनही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकताना ही कामगिरी केली आहे.