जलद मिळणार माहिती : “इक्युजेकोर्ट लाईव्ह बोर्ड पुणे’ ऍप विकसित
पुणे – जमीन विषयक दाव्यांची सुनावणीसाठी पक्षकार व वकील यांना सकाळपासून थांबावे लागते. आपल्या केसचा नंबर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष असते. तसेच, एकाच ठिकाणी गर्दी होते. आता हे चित्र बदलले असून जमिनीच्या केसेसच्या सुनावणीची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी “इक्युजेकोर्ट लाईव्ह बोर्ड पुणे’ असे ऍप विकसित केले आहे. या ऍपच्या माध्यमातून सध्या कोणत्या केसची सुनावणी आहे. आपल्या केसची सुनावणी किती वाजता होणार आहे, याची माहिती मोबाइलवर समजणार आहे. केसची रियल टाईम माहिती देणारा देशातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन विषयक केसची सुनावणी होती. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केसचा निकाल लागल्यानंतर पुढील अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल होते. त्यामुळे याठिकाणी दाखल होणाऱ्या केसेसची संख्याही मोठी असते. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
विशेषत: ग्रामीण भागातून नागरिकांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. दोन-तीन तास प्रवास करून नागरिक या ठिकाणी येतात. सकाळी सुमारे 11 वाजता बोर्ड सुरू होते. मात्र, सकाळपासूनच पक्षकार व वकिलांची गर्दी होण्यास सुरू होते. प्रत्यक्षात दोन वाजता केसची सुनावणी होणार असली तरी नागरिक सकाळपासून उपस्थित राहतात. हे चित्र बदलण्यासाठी तसेच पक्षकार व वकिल यांचा वेळ वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. एनआयसीच्या माध्यमातून हे मोबाइल ऍप तयार केले आहे.
ज्या नागरिकांकडे मोबाइल नाही, त्यांना सध्या कोणती केसची सुनावणी आहे, याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आणि कॅन्टिंन याठिकाणी डॅशबोर्ड बसवले आहेत. त्यामुळे तळमजल्यावर असलेल्या व्यक्तींनासुद्धा पाचव्या मजल्यावरील केसच्या सुनावणीची माहिती मिळते, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
या सुविधेमुळे झालेले फायदे
करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यास मदत झाली.
लाव्हई बोर्ड आणि मोबाइलवर सुनावणीची वेळ समजते.
यापूर्वी साडेपाचपर्यंत सुनावण्या चालत होत्या. आता दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपत आहेत.
वेळेची बचत
एका सुनावणीला तीन मिनिटे लागतात. त्यानुसार वेळ दिली जाते.