श्रीगोंदा – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यात युवक काँग्रेसच्या वतीने उपहासात्मक आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल व डीझेल दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर येणार्या ग्राहकांना गुलाब पुष्प देण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वाबळे म्हणाले, देशात काँग्रेसचे सरकार असताना कच्चा पेट्रोलचा प्रतिबॅलर 100 ते 120 डॉलर भाव असताना दर 70 ते 72 रुपये प्रतिलिटर होते. सध्याचे भाव प्रतिबॅलर 50 ते 60 डॉलर असतानाही पेट्रोलचे दर प्रतिलिटर 90 ते 100 झाले आहेत. करोना काळात अनेक होतकरू तरुणांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या आहेत.
अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असतानाही मोदी सरकार इंधन दरवाढ करून त्यांची लूट करत आहे. सर्वसामान्य लोकांना कोणतीही दयामया न दाखवता अच्छे दिनच्या नावाखाली दिवसा ढवळ्या लोकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारून आपले व आपल्या सहकारी मंत्र्यांचे शौक पुरवताना दिसत आहेत. भविष्यात जर अशीच परस्थिती राहिली, तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणखी तीव्र आंदोलने करण्यात येईल.
यावेळी नगरसेवक समीर बोरा, गणेश भोस, अॅड. अनिकेत भोसले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, आदिल शेख, धीरज खेतमाळीस, जैद अत्तार, आदेश शेंडगे, अक्षय नितनावरे, शिवराज ताडे, इंद्रजित शिंदे, सागर वाघमोडे, भूषण शेळके, किरण चव्हाण, रोहन खेडकर, तेजस गलांडे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.