नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील संशयीत मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्याने बोठे याच्या अडचणींत वाढ झाली असली, तरी याचबरोबर पोलिसांवर देखील बोठे याच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे.
न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या न्यायालयापुढे बोठे याच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि.1) सुनावणी झाली. यावेळी अॅड. रश्मी गौर यांनी सरकारी पक्षातर्फे, तर बोठे याच्यातर्फे अॅड. संतोष जाधवर यांनी काम पाहिले. यावेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला.
रेखा जरे यांची हत्या पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पोलीस तपासात जरे यांच्या हत्याकांडामागे बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तसे तांत्रिक सबळ पुरावे मिळाले आहेत. अटक होणार, या भीतीनेच बोठे दोन महिन्यांपासून पसार आहे. बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामार्फत स्टँडिंग वॉरंट देखील जारी केले आहे. तरी देखील बोठे याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
बोठे याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात देखील प्रयत्न केले होते. तेथे त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेथेही आज जामीन फेटाळला. त्यामुळे बोठे याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
बाळ बोठेला अटक केल्याची चर्चा..!
रेखा जरे हत्याकांडातील संशयीत मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सोमवारी (दि.1) रोजी दिवसभर सुरू होती. त्यामुळे माध्यमांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना विचारले असता, त्यांनी याबाबत मला अद्याप काहीही माहिती नसल्याचे सांगितले.