पिंपरी – करोनामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. तर, याचा मोठा फटका राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) सहन करावा लागला. मात्र, आता करोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याने एसटीची वाहतूक सुरळीत होत आहे. यात उत्पन्न वाढीसाठी आलेली लगीनसराईचा हातभार सुद्धा वल्लभनगर आगाराला लागला आहे. गेल्या दीड महिन्यात आगाराला लग्नासाठी दिलेल्या गाड्यांमधून सुमारे सव्वालाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
करोनामुळे टाळेबंदी केल्याने एसटीला सुमारे 7 ते 8 महिने प्रवासी वाहतूक बंदच करावी लागली होती. यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु आता परिस्थिती सुधारत असल्याने एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड महिन्यात चार गाड्या ल्ग्नासाठी वाहतुकीस गेल्या. यातून आगाराला 1 लाख 22 हजार 95 रुपये इतके उत्पन्न मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसटीचा प्रवास आरामदायी
लग्न समारंभासाठी वल्लभगनर आगारातून शिवशाही, परिवर्तन, साधी शयनयान व स्लिपर बसची सोय आहे. सुरक्षित व आरामदायक प्रवासासाठी एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन वल्लभनगर आगार स्थानप्रमुख गोविंद जाधव यांनी नागरिकांना केले आहे.