बीड – मागील चार ते पाच दिवस बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांच्या गटाला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच यश मिळाले आहे. परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडे यांच्या गटाने शानदार कामगिरी केली आहे. तर भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे.
खुद्द धनंजय मुंडे यांनीच १२ पैकी १० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुक झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन मुंडे यांनी ट्विटद्वारे केले आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार परळी तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींपैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी, लाडझरी या सहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. तर रेवली आणि वंजारवाडी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.