ग्रामपंचायतीचा धुराळा : ‘फॉरेन रिटर्न’ उमेदवाराच्या पॅनलचा शानदार विजय

हिंगोली – राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. मात्र हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी गावची  ग्रामपंचायत निवडणूक यावेळी थोडी वेगळी होती. दिग्रसवाणी गावात वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलमध्ये चक्क फॉरेन रिटर्न उमेदवाराचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पॅनलचा शानदार विजय झाला आहे.

दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले. या पॅनलमधील ८ उमेदवार विजयी झाले आहेत.

आदिवासी समाजातील डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव केले आहे. डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर दाम्पत्य दिग्रसवाणी गावात सातत्याने सामाजिक कार्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसले तरी तरी वंचितच्या ग्राम विकास आघाडीने डॉ. चित्रा यांनाच सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करून प्रचार केला. तसेच त्यांच्या आघाडीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.